Posts

Showing posts from March, 2026

“कुंपणावरची सावली”

Image
आज त्या म्हातारीला पाहिलं, अडखळत-अडखळत कुंपणाशी आली… थकलेलं शरीर, थरथरणारे हात, काहीतरी शोधत होती—तिचंच घर की तिचंच साथ? भरल्या डोळ्यांनी पुन्हा मागं फिरली, जणू भूतकाळानेच तिला हाक मारली; क्षणभर थांबली, नजर चुकवली, आणि स्वतःशीच पुटपुटत ओढ दाबत चालू लागली. वृद्धाश्रमाच्या त्या दाराशी— किती कहाण्या अडकलेल्या असतात, आईच्या कुशीत वाढलेले सारे, आता तिला ओझं म्हणतात. तिच्या पावलात वेदना होती, तिच्या श्वासात हंबरडा; कुंपणावर विसावलेली ती सावली जणू विचारत होती— "चूक माझी होती का, की काळाचा खेळच खोडकर झाला?" आज त्या म्हातारीची चाल हलली, पण मन तिचं ढासळलं होतं; जगलेल्या आयुष्याच्या आठवणींनी तिचं खरं घर अजूनही तिथेच होतं… वृद्धाश्रमाच्या दाराशी ती पुन्हा उभी, पण मन मात्र जुन्या घराच्या अंगणात, तेच तिने पुटपुटत सांगितलं— “जगानं ठरवलं तरी… मी अजूनही त्यांचीच आई आहे.”