सहा तासांचा सोबती...
एकदा मुंबईहून गावी येत होतो...गावी येण्याची ओढ ही मला लहानपणापासूनच होती...शिवशाही बस ने मी मुंबईहून निघालो,प्रवास माझा एकट्यालाच करायचा होता पण नशिबी एक साथीदार देऊन गेला...दादर ला माझं boarding झालं , मी मोबाइल काढला आणि गाणी ऐकत माझा प्रवास सुरु केला....प्रवासात मला गाणी ऐकण्याची सवयच आहे...माझ्या बाजूची सीट रिकामी होती आणि मला नव्हतं माहीत की ती रिसर्व्ह आहे ...म्हणून मी माझी बॅग बाजूच्या सीट वर ठेवली आणि डोळे मिटून गाणी ऐकत होतो...पनवेल आलं आणि मला एका आजींनी खुनावलं..मी ताडकन जागा झालो आणि काय झालं विचारलं ...तेवढ्यात त्या आजी स्मितहास्य करून म्हणल्या "बाबू ही सीट माझी आहे , बॅग उचलतोस का?" मी पण हसूनच उत्तर दिलं "अहो बसा ना तुमचीच आहे सीट"...साधारण पाहिलं तर त्या आजींचं वय 70 ते 75 असेल...मी पुन्हा गाणी ऐकण्यात गुंग झालो....
थोड्यावेळाने माझी नजर सहज त्या आजींकडे गेली त्या एकटक माझ्याकडे पाहत होत्या..."काय झालं आजी असं का पाहताय काही हवं का?" मी विचारलं..."काही नाही , तुला पाहून माझ्या नात्वाची आठवण आली,5 वर्ष झाली पाहिलं नाही त्याला" असं त्या आजी म्हणाल्या..."मग नातवाला भेटायला जाताय वाटतं" मी पण जरा भावुक होऊनच विचारलं..."हो,5 वर्ष झाली त्याला पाहून" आजींनी देखील भावुक होऊनच उत्तर दिलं....5 वर्षानंतर आपल्या नातवाला भेटयाला निघालेली ही आजी मनातून खूप उत्सुक वाटत होती...पण तिच्या डोळ्यातले भाव काहीतरी वेगळंच सांगत होते...
"काय रे तुझं नाव काय " आजीने मला विचारलं..."प्रथमेश, प्रथमेश महाडिक" मी चटकन नाव सांगून दिलं...आजी हसल्या आणि म्हणाल्या "वा छान नाव आहे रे"..."तुमच्या नातवाचं नाव काय?" मी विचारलं..."श्रेयस नाव आहे त्याचं, मीच ठेवलं आहे" आजींनी उत्तर दिलं..."काय रे प्रथमेश तुम्हा आजकालच्या मुलांना कांठोल्या घातल्याशिवाय जमतच नाही का, नेहमी बघावं तेव्हा कानात या वायरी घातलेल्याच असतात" आजींचं हे बोलणं ऐकून मी हेडफोन काढले आणि त्यांच्या कडे पाहून हसलो...
"मग आजी मुंबईत कुठे असता" मी विचारलं..."परळ ला लेकीकडे होते" आजींनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं...."तू कुठे असतोस आणि काय करतोस" आजीनं मला विचारलं..."मी खेड ला असतो कामासाठी , खरं तर कॉलेज चं शिक्षण माझं खेड ला झालं आता तिकडेच नोकरीला आहे,दादर ला घर आहे म्हणून मग अधून मधून येत असतो" असं मी आजींना सांगितलं.....आमच्या बस प्रवासात बऱ्याच गप्पा रंगत होत्या ,आजी त्यांच्या नातवाच्या आणि मी माझ्या आजीच्या आठवणी सांगत होतो...आम्ही दोघेही गप्पांमध्ये एवढे गुंतलो की वेळ कसा गेला तेच नाही कळलं...
शेवटी माझा स्टॉप आला म्हणून मी माझी बॅग काढली आणि "आजी येतो मी काळजी घ्या" असं म्हणत सीट बाहेर आलो...दोन पावलं पुढे टाकणार तेवढ्यात आजींनी अडवलं आणि त्यांच्या बटव्यातून एक चॉकलेट काढलं आणि मला देत म्हणल्या "बाळा आयुष्यात काळजी करणारे बरेच असतात , पण काळजी घेणारे फार कमी मिळतात, या 6 तासाच्या प्रवासात तू माझी तुझ्या आजी सारखी काळजी घेतलीस त्याबद्दल धन्यवाद" एवढं ऐकल्यावर का कुणास ठाऊक माझा हात आजींच्या पायाजवळ गेला आणि मी त्यांचा आशीर्वाद घेत म्हणालो "नाती सगळेच जपतात पण कमी जण टिकवतात आपली भेट होईल की नाही माहीत नाही पण आपण पुन्हा नक्की भेटू...एवढं बोलून मी निघालो खरा पण डोळ्यात टिपूस होतं माझ्या...मनातून वाटत होतं की या आजी सोबत चा प्रवास कधीच संपू नये....बस मधून उतरलो आणि हात वर करून त्यांना शेवटचं बाय म्हटलं...गाडी सुटली तरी त्या आजी मागे वळून मलाच पाहत होत्या...जो पर्यंत त्यांच्या नजरेसमोरून मी जात नाही तोपर्यंत....
खरच काही नाती खूप वेगळी असतात ना...क्षणभरासाठी येतात आणि आयुष्यभराची साठवण देऊन जातात...अजूनही कधी बस ने प्रवास केला ना तर त्या आजींची आठवण नक्की येते.....
-प्रथमेश महाडिक (काल्पनिक)
Comments
Mast.....👌👍👍😊