गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...


वर्षाचा सण ह्यो कोकणकरांच्या जिव्हाळ्याचा...जगाच्या कानाकोपऱ्यात वसलेला चाकरमानी गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो...आपल्या लाडक्या बाप्पाला वर्षानी भेटायचा योग असतोच पण कुटुंब एकत्र येऊन सण साजरा होणार याचा आनंद जास्त असतो...गावखेड्यातला पोर शहरात गेलं मुंबई पुणे अहो एवढंच काय तर सातासमुद्रापलिकडे गेलं...तरी त्याला गावची ओढ काही सुटेना...काय रे या वर्षी गणपतीला गावी येतोयस ना? असा आपुलकीने प्रश्न विचारणारे आजी आजोबा नातवंडांची वाट बघत   अंगणात डोळे लावून बसलेले असतात...बसणारच कारण वर्षभराने नातवंडांचा किलबिलाट पुन्हा अंगणात ऐकायला मिळणार असतो...आपल्या लाडक्या नातवंडांची चांगली खतीरदारी व्हावी यासाठी आजीचा बटवा हा तयारच असतो...
नातवंड या पाच दिवसात साऱ्या घराचा नकाशा बदलून टाकतात वर्षभर पसरलेली शांतता एका क्षणात नाहीशी होऊन जाते...नातवंडांसोबत 5 दिवसच घालवायला मिळणार हे आजी आजोबांना माहीत असतं पण या 5 दिवसांच्या आठवणी संपूर्ण वर्षभर त्यांच्या आयुष्यात गोडवा निर्माण करतो...आणि हा गोडवा कायम राहावा यासाठी आजी आजोबा आपल्या हृदयावर दगड ठेऊन नातवंडांची वर्षभर वाट पाहत असतात...
आपला लाडका बाप्पा घरी आला,आणि 5 दिवसांनी पुन्हा आपल्या गावी निघून गेला...बाप्पा आपल्या गावी गेलाच पण चाकरमानी देखील बाप्पाचं विसर्जन होताच आपल्या शहराकडे काम धंद्याला जायला निघाले...जाताना 'पुढच्या वर्षी लवकरच येतो ' असं म्हणून गेले...5 दिवस घरातला किलबिलाट क्षणात शांत झाला...नातवंडांना परत जाताना आजी आजोबांचे डोळे पाणावले..हे पाणावलेले डोळे बरच काही सांगत होते...नातवंडांना बाय करण्यासाठी हात वर केला..नातवंडांना बाय करत निर्मळ मनाने ते एवढंच बोलले 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या'

Comments

Popular posts from this blog

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

ती आणि....

असावं कुणीतरी....