"कोऱ्या पानावर उमटलेले सावट”
:
कोऱ्या पानावर गिरवत बसलो…
पण आज अक्षरं माझ्या हातून नव्हती उमटत,
ती स्वतःच पडत होती… जणू काही कुणीतरी आतून लिहत होतं.
शाईचा प्रत्येक थेंब थरथरत होता,
कारण शब्द साधे नव्हते…
ते जखमा होत्या, ज्या मी वर्षानुवर्षं लपवल्या होत्या.
त्या कोऱ्या पानावर सुरुवात केली मी “मी ठीक आहे” ने…
पण काही क्षणातच ओळ बदलली —
“मी ठीक नव्हतो कधीच…”
हात चालत होता, पण मन मागे खेचत होतं,
जुन्या आठवणींच्या अंधाऱ्या कोपऱ्यात…
जिथे अजूनही काही आवाज अडकलेत,
कुणाचं हसू… कुणाचं रडणं… आणि माझं मौन.
प्रत्येक शब्द लिहताना असं वाटत होतं,
जणू मी स्वतःलाच उघडं पाडतोय…
नग्न सत्यासमोर उभा आहे…
जिथे खोटं लपवायला कुठलंच आच्छादन नाही.
अचानक पानावर काही ओळी उमटल्या —
ज्या मी लिहल्याच नव्हत्या…
“तू अजूनही तिथेच अडकला आहेस,
त्या एका क्षणात…
जिथे सगळं संपलं होतं,
आणि तू मात्र पुढे चालत राहिलास…”
मी घाबरलो…
कारण त्या ओळी माझ्या मनातल्या नव्हत्या,
त्या माझ्या “आतल्या अंधाराच्या” होत्या…
खोलीत शांतता होती,
पण ती शांतता आरडाओरड करत होती…
जणू भिंतींवर कुणीतरी नखांनी ओरखडे काढत होतं,
आणि त्या आवाजाने माझं अस्तित्व हादरत होतं.
मी पेन खाली ठेवलं…
पण पानावरचे शब्द थांबले नाहीत…
ते वाढतच गेले…
आणि शेवटी एकच वाक्य ठळक दिसू लागलं —
“तू पळू शकत नाहीस स्वतःपासून…”
त्या क्षणी लक्षात आलं…
मी कोऱ्या पानावर काही लिहत नव्हतो,
तर ते पान मला वाचत होतं…
माझ्या आतल्या प्रत्येक भीतीला,
प्रत्येक वेदनेला,
प्रत्येक न सांगितलेल्या गोष्टीला…
आणि अचानक…
त्या पानावरची शाई लाल झाली…
मी थरथरलो…
कारण ती शाई नव्हती…
तो माझ्या दडपलेल्या भावनांचा रक्तस्त्राव होता…
कोऱ्या पानावर गिरवत बसलो होतो मी…
पण शेवटी कळलं —
कोरं पान कधीच कोरं नसतं…
ते फक्त वाट पाहत असतं…
तुझ्या आतल्या अंधाराला बाहेर आणायची…
आणि एकदा का तो अंधार उमटला,
की मग…
तो पानावरच नाही,
तुझ्या आयुष्यावरही कायमचा कोरला जातो…
Comments