माणुसकी खरच हरवली का???


रात्रीचे साडेअकरा… पावसाचे थेंब छपरावर पडत होते, आणि गावातल्या जुन्या विहिरीजवळ एक माणूस धापा टाकत उभा होता…
“वाचवा… कुणीतरी वाचवा…!” त्याचा आवाज काळोखात विरून जात होता.
त्या माणसाच्या हातात एक छोटंसं मूल होतं. रक्ताने माखलेलं. त्याचे डोळे भीतीने मोठे झालेले… पण आवाज मात्र बंद…
गावातले काही लोक धावत आले. कुणीतरी टॉर्च लावला. प्रकाश पडला… आणि एक क्षण सगळे थिजले.
“कोण आहे हा…?”
“आपल्या गावचा नाही वाटतो…”
“कुठल्या जातीचा असेल…?”
तो माणूस हात जोडून विनवणी करत होता —
“माझ्या मुलाला वाचवा… कृपया… हॉस्पिटलला न्यायचंय…”
पण प्रश्न बदलला —
“जात कोणती आहे तुझी…?”
क्षणभर काळ थांबला…
त्या वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. त्याने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं —
“माझ्या मुलाची जात… ‘माणूस’ आहे… एवढंच माहित आहे मला…”
पण तिथे उभ्या असलेल्या लोकांना ते उत्तर पुरेसं नव्हतं.
कुणीतरी मागे सरकलं…
कुणीतरी कुजबुजलं…
“आपल्यातला नाही… हात लावू नका…”
आणि त्या रात्री…
पावसाचे थेंब थांबले… पण माणुसकीचं रक्त वाहत राहिलं…
दुसऱ्या दिवशी सकाळी…
विहिरीजवळ शांतता होती.
पण जमिनीवर सुकलेले रक्ताचे डाग… एक गोष्ट सांगत होते…
त्या मुलाने शेवटचा श्वास घेताना…
कदाचित विचार केला असेल —
“मी चुकीचा जन्म घेतला का…?”
जात… धर्म…
हे शब्द आपण माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर शिकतो…
पण माणुसकी…?
ती आपण विसरतो…
आजही प्रश्न तोच आहे —
आपण आधी ‘माणूस’ आहोत का…
की कुणाच्या तरी ‘जात’ आणि ‘धर्म’ चे प्रतिनिधी…?
जेव्हा एखाद्याचा जीव जातो…
तेव्हा त्याचा धर्म मरत नाही…
त्याची जात मरत नाही…
मरते ती फक्त… माणुसकी…
कदाचित…
त्या रात्री जर कुणीतरी फक्त “माणूस” म्हणून पुढे आलं असतं…
तर एक जीव वाचला असता…
आणि आपल्या समाजातली माणुसकीही…
पण आता…
आपण अजूनही त्याच प्रश्नात अडकलो आहोत —
“जात की धर्म…?”
उत्तर सोपं आहे…
पण ते स्वीकारायला आपण अजून तयार नाही…
कारण… माणूस होणं सर्वात कठीण आहे…

Comments

Popular posts from this blog

तीन चाकांची कहाणी...

श्रीमानयोगी.... वाचनातला माझा न थांबणारा प्रवास...

"आख़िर हम कहानी बन जाते हैं..."